मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

दिवस

२७ सप्टेंबर, २०२२ · अद्यतन १७ नोव्हेंबर, २०२२

फांदीवरून पाखरू निर्ममपणे उडून गेलं,

तरी डोळ्यांना धारा लागण्याचे दिवस.

उन्हाळलेल्या दिवसांमधले दमदार सोनेरी रंग…

कुठून मागे राहावेत, सांग.

सांग, कशी आठवावी दयाळाच्या शुभ्र पिसाची जादुई रेष,

कशी ओलांडावी मनानं पागोळ्यांची पोलादी वेस?

कुठून कशा तुरतुराव्यात नाचऱ्या खारी छपरांवरून?

कावळ्यांच्या स्मार्ट स्वाऱ्याही न थबकताच निघून जातात दारावरून.

आभाळ उन्हाविना उदास, गच्च, ओथंबून.

सांग, कधी संपतील हे बोचऱ्या, गप्पगार वाऱ्यांचे दिवस?

फांदीवरून पाखरू निर्ममपणे उडून गेलं,

तरी डोळ्यांना धारा लागण्याचे हे लांबलचक दिवस.

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2022/09/blog-post_27.html