मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

आपल्याला कुठे घाई आहे?

१७ फेब्रुवारी, २०२०

तुझ्या रुंद पाठीमागून चालताना

वाट उतरत जाते पायांखाली

सरसरत.

घामेजून उसासणाऱ्या, रोडरेजनं धुमसणाऱ्या शरीरांची रस्तोरस्ती सळसळणारी जंगलं

बघता बघता म्यूट होतात.

तुझ्यावरच्या रागाचीही होत जातात,

लालभडक फुलं.

हौसेनं एकेकं टपोरं फूल खुडून घ्यावं

आणि गुच्छ धरावा छातीशी,

तसा तुझ्यावरचा सगळा राग एकवटून

खोचून घेते छातीशी,

नजरेचा बाण रुतवते तुझ्या खांद्यावर,

आणि बिनदिक्कत डोळे मिटून चालताना

हुंगत राहते

माझ्या इच्छांचा सुरंगी गंध.

वाट चुकेल?

चुकेना.

आपल्याला कुठे घाई आहे?

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2020/02/blog-post.html