मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

काही नाही

५ जानेवारी, २०१८ · अद्यतन ६ जानेवारी, २०१८

यंदा

सोसासोसानं काही नवं विकत घेणार नाही.

इक्कत, कलमकारी, बाटिक, डबल ढाबू, जयपुरी सूत, ठशाचं सूत, बांधणी… काही नाही.

वाकवलेल्या तारांचे, पांढऱ्या धातूचे, वाळवलेल्या नि भाजलेल्या मातीचे, लाकडी कोरीवकामाचे, रंगीत लाकडांचे, चमकदार दगडांचे, हत्तींचे नि घुबडांचे, हरणांचे नि सशांचे, मांजरांचे नि पाखरांचे…

कसले म्हणून नवे कानातले नाही.

नव्या नव्या च्यानेलांच्या मेंबरशिपा घेणार नाही.

जिमच्या पायी पैसे वाहणार नाही.

नवीन पुस्तकांचे ढीग उशापायथ्याशी लावणार नाही.

काही म्हंजे काही नवं शिकायची आस धरणार नाही.

नवनवीन प्रवासांची हावरी स्वप्नं रंगवणार नाही.

हावरेपणानं नव्यानव्या माणसांच्या गोतावळ्यात शिरणार नाही.

आहे तोच

कपडालत्ता, डागदागिना, पुस्तकंमासिकं, भरलेल्या हार्डडिस्का भोगणार आहे मनःपूत.

आहेत त्याच घरांच्या खिडक्याबाल्कन्या न्याहाळणार आहे उन्हापावसात.

जुन्याच सवयीच्या रस्त्यांवरून नि जन्मापासूनच्या शहरांतून हिंडणार आहे पाय दुखेस्तो.

जिवाजवळची माणसं अजून जवळ ओढून घेणार आहे जमतील तितकी.

जुनी जुनी होत जाणार आहे विटक्या, मऊ कुडत्यासारखी होता होईतो.

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2018/01/blog-post.html