मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

लिहिण्याची सवयच गेलीय

लिहिण्याची सवयच गेलीय. विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी? उगाच खुजली म्हणून. पांढर्‍यावर आपल्या नावानं काळं झालेलं दिसलं की गारगार, एकदम सत्ताधीश वाटतं म्हणून. कुणी कुणी 'वा, छान' म्हणतं म्हणून.…

१९ मे, २००९ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

लिहिण्याची सवयच गेलीय.

विश्राम बेडेकरांनी म्हटलं आहे, त्या चालीवर आपण लिहिल्याशिवाय जगू शकतो म्हणजे आपण लेखक नाही. मग हा अट्टाहास कशासाठी?

उगाच खुजली म्हणून.

पांढर्‍यावर आपल्या नावानं काळं झालेलं दिसलं की गारगार, एकदम सत्ताधीश वाटतं म्हणून.

कुणी कुणी ‘वा, छान’ म्हणतं म्हणून.

कुणी ‘कशाला लिहिता ही नष्ट घाण’ असं खरोखरीचं चिडून विचारल्यावर अजूनच उचकायला होतं म्हणून.

एरवी काही अंगाला लावून न घेता अल्लाद पार होणार्‍या आपल्या वॉटरप्रूफ कातडीला लिहिता लिहिता कुठेतरी जोडलं गेल्यासारखं वाटतं म्हणून.

कुठल्यातरी आठवणीतल्या किंवा स्वप्नातल्या क्षणाच्या अर्धुकात, लिहिल्यावर एकदम रितं-मोकळं-ओझंहीन वाटल्याचा भास अजून शिल्लक आहे म्हणून.

सगळीच उत्तरं. किंवा कुठलीच नाहीत.

पोटाचा खड्डा भरून बराच रिकामटेकडा वेळ आणि खुमखुमणारी ताकद उरते हेच कदाचित उत्तर.

तरीही लिहिण्याची सवय गेलीय. म्हणजे आपण लिहिण्यावाचण्याला एक निरुपयोगी छंद मानणार्‍या लोकांइतके माजलो की काय? कदाचित तसंच.

हा माज उतरवण्याकरता तरी लिहीत राह्यलं पाहिजे.

लिहिण्याची सवयच गेलीय, तरीही.

मेघना भुस्कुटे

काहीबाही

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2009/05/blog-post.html