मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

वेळ

४ एप्रिल, २००८ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

शब्द म्हणजे निव्वळ चिखल असं वाटण्याची वेळ येतेच,

आजची वेळ त्यातली.

जगातले यच्चयावत हिंदी सिनेमे,

सगळीच्या सगळी आयन रॅण्ड,

पाऊस, संध्याकाळ, भण्ण दुपार.

ही सारी आपल्या रक्तातली निव्वळ बेअक्कल,

असंही वाटण्याची वेळ येतेच.

शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.

ही विषकन्येसारखी आकर्षक जीवघेणी वेळ.

तिला स्पर्श करण्यासाठीही शब्दांचंच शरीर?

एखाद्या वखवखलेल्या ब्रह्मचारी बैराग्याचं प्राक्तन…

हे देहाला शरण जाण्यातलं वैफल्य?

की शरीराच्या सगळ्या सामर्थ्यांचे उत्सव?

उत्तरं फेकून मारता येतात,

तरी प्रश्न मरत नाहीत.

रस्ते चुकवता येतात,

देणी मात्र चुकत नाहीत…

ही समजूत रक्तात रुजून येण्याची वेळ कधी ना कधी प्रत्येकावर येतेच.

आजची वेळ त्यातली.

शब्द म्हणजे निव्वळ चिखल हे कळण्याची वेळ येतेच.

आजची वेळ त्यातली.

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2008/04/blog-post.html