मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

दोन ब्लॅकाउट्सच्या मधल्या प्रवेशासारखी एक संध्याकाळ!

पावसानं गच्च दाटून अधिकच काळोखी, कातर केलेली संध्याकाळ. आधीच कासावीस वेळ. त्यात ही न कोसळणारी गुदमर. समोर पसरलेला लांबलचक हिरवागच्च शेताडीचा पट्टा. त्याला लागून असलेली जडावलेली गप्प गप्प खाडी. साऱ्याच्या निरंतरपणात भर टाकणारे पार क्षितिजापर्यंत वगैरे जाणारे आगीनगाडीचे फिलॉसॉफिकल…

५ जुलै, २००७ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४

पावसानं गच्च दाटून अधिकच काळोखी, कातर केलेली संध्याकाळ. आधीच कासावीस वेळ. त्यात ही न कोसळणारी गुदमर. समोर पसरलेला लांबलचक हिरवागच्च शेताडीचा पट्टा. त्याला लागून असलेली जडावलेली गप्प गप्प खाडी. साऱ्याच्या निरंतरपणात भर टाकणारे पार क्षितिजापर्यंत वगैरे जाणारे आगीनगाडीचे फिलॉसॉफिकल रूळ आणि ऐन जुलैचा वेडसर वारा. या सगळ्याला अपुरेपण येऊ नये म्हणून की काय - चक्क चुकार बगळ्यांची एक पांढरीशुभ्र माळ.

सोबतीला एकटेपण. आसमंतात भरून राहिलेलं. कधी कोसळेल अंगावर त्याचा नेम नाही, पण तूर्तास तरी दबा धरून असलेलं. पावसासारखंच काळोखी करून.

आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे हे कळण्याची सुतराम शक्यता नसलेली गर्दी पार्श्वभूमीला पसरलेली. आपापल्या क्युबिकल्समधे, आपापल्या फोन्सवर, पीसींसमोर मश्गूल. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एका काचेच्या दरवाज्याचं अंतर. मागे स्वत:ला कामात बुडवून घेतली इमारत आणि आपण असे वारा अंगावर घेत सज्जात उभे.

मागचं-पुढचं सगळं काही क्षणांपुरतं नि:संदर्भ करून टाकत. काळाच्या मागच्या तुकड्यावर जे घडलं आहे त्याची जबाबदारी खांद्यावर पेलत, येणाऱ्या वाटेवर काय असणार आहे याबद्दल उत्सुक, पण पुरते बेखबर. सावध आणि बेसावधही. पूर्ण त्या क्षणाचे होऊन जाऊ पाहणारे. वर्तमानाच्या सतत धावत्या, निसटत्या तुकड्यावर जिवाच्या कराराने पाय घट्ट रोवून उभे असलेले.

धडधडणाऱ्या निर्दय शहराच्या कुशीत मिळून गेलेली ही शांत-निवांत-जिवंत संध्याकाळ.

यापरता अधिक आनंदाचा क्षण काय असू शकतो?

एन्जॉय…

मेघना भुस्कुटे

काहीबाही

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2007/07/blog-post.html